Skip to main content

इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

 इचलकरंजी, प्रतिनिधी - क्रिकेट, फुटबॉल यासह अनेक विदेशी खेळ पाहणारे शौकीन वाढत आहेत. मात्र आता देशी खेळांना व्यापक स्वरुप आणणं, देशी खेळ खेळणार्‍या खेळाडुंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळं होड्यांच्या शर्यतीला प्रोत्साहन म्हणून श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीनं होणार्‍या दरवर्षीच्या होड्यांच्या शर्यतीसाठी 51 हजाराचं बक्षिस देण्याचं खासदार धनंजय महाडीक यांनी जाहीर केलं. दरम्यान भक्त मंडळाच्यावतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.

       



   श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्यावतीनं होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमीत्तानं आलेल्या खासदार महाडीक यांनी वरदविनायक मंदिरात श्रींची आरती केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे संस्थापक मल्लय्य स्वामी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून होड्यांच्या शर्यती व्हायच्या पण कोरोना महामारीमुळं खंडीत झालेल्या या शर्यती पुन्हा सुरू केल्याचं सांगितलं. त्यानंतर खासदार महाडीक यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत नदीत पुष्पवृष्टी करून शर्यतीला प्रारंभ झाला. 

यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 8 बोट क्लब सहभागी झाले होते. या शर्यती पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठाबरोबरच लहान आणि मोठ्या पुलावर शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. घोषणाबाजी करत हे शौकीन स्पर्धाकांना प्रोत्साहन देत होते. चुरशीनं झालेल्या या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम, समडोळी बोट क्लबनं द्वितीय, इचलकरंजीतील वरद विनायक बोट क्लबनं तृतीय क्रमांक पटकावला. तर सांगलीच्या रॉयल बोट क्लबला चौथ्या क्रमांकावर समाधान  मानावं लागलं. खासदार महाडीक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आलं. यावेळी खासदार महाडीक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांनी दरवर्षी होणार्‍या या शर्यतीसाठी 51 हजार रुपये बक्षिस देण्याचं जाहीर केलं. यावेळी भक्त मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे, विरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल स्वामी, सुरेशदादा पाटील, अमृत भोसले, बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, जयराम पाटील, दिलीप मुथा यांच्यासह मान्यवर, भक्त मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 

Comments