Skip to main content

जयंत महापात्रा :घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी 

(९८ ५०८ ३० २९०)

prasad.kulkarni65@gmail.com

मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे  जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू झाला. १९४९ ते १९८६ या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले.जयंत महापात्रानी वयाच्या चाळीशीत कवितेचा हात धरला. आणि पुढची अर्धशतकाहून अधिक काळ कवितेसोबत समृद्ध वाटचाल केली. उडिया भाषेतील सात, इंग्रजी भाषेतील वीस असे तब्बल २७ काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांनी ललित लेखनही केले होते.लघु कथा लिहिल्या. उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला होता.'चंद्रभागा ' या सकस साहित्य चर्चा करणाऱ्या नियतकालिकाचे ते संपादकही होते.जयंत महापात्रांना सार्क साहित्य पुरस्काराबरोबर देशविदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले होते.२००९ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. असहिष्णुतेची वाढणारी पातळी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळा घोटण्याचे होणारे प्रयत्न याचा निषेध करत त्यांनी २०१५ साली पद्मश्री पुरस्कार परत केला होता.

"भारताचा जीर्ण झालेला चेहरा

एकट्याने मरणार्‍या मुक्या, 

एकाकी कवींचे कमजोर डोळे धारण करतो."

किंवा

"जगातील सर्व काव्य

राखेतून उठलेले दिसते.

राख आपल्यामध्ये बसते आणि

आपले हात आपल्या खांद्यावर ठेवते."

माझ्या वेदना इंद्रधनुष्याप्रमाणे रिकाम्या होतात,वारा मला नदीच्या मध्यभागी खेचतो असे त्यांच्यातील कवी म्हणतो.ग्रँडफादर, हंगर ,इंडियन समर यासारख्या त्यांच्या अनेक अभिजात कविता त्यांच्या प्रखर सामाजिक भानाची प्रचिती दाखवतात. दांभिकतेवर प्रहार करणारा आणि वास्तवाला थेट भिडणारा हा कवी होता.आपल्या पूर्वजांच्या आणि पूर्वसरींच्या काळजात शिरून त्या भावना कवितेतून शब्दबद्ध करण्याची त्यांची अनोखी शैली हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण होतं. त्यांच्या कवितेतील तीव्रता आणि सौंदर्य दोन्ही स्तीमित करणारं आहे.  त्यांची भाषा अभिव्यक्तीतून आक्रोश व्यक्त करते.दारिद्र्य, भूक,भय, आणि मृत्यू या मानवी चिंतातून त्यांच्या कवितांना एक सत्याचा मार्ग गवसतो. साहित्यातील नव्या प्रवाहांशी त्यांचा सूर मिळता होता.मानवतेवर निष्ठा ठेवणारा ,एक वैश्विक भान असलेला आणि घट्ट भारतीयत्व जपणारा जागतिक साहित्यात गौरवला गेलेला एक थोर कवी म्हणून त्यांची ओळख होती. जयंत महापात्रा यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

Comments